मुंबई, अजित मांढरे, प्रतिनिधी : राज्यातील लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा गोड बातमी मिळणार आहे. कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज तिसरा हफ्ता बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.
आज दुपारी ४ नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता कधीही खात्यात जमा होवू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. तर, ॲागस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ज्या बहिणींनी अर्ज केला आहे. त्यांना एकत्रितपणे ३ महिन्याचे ४ हजार ५०० रुपये मिळण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सणांचे गिफ्ट म्हणून ॲाक्टोंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचे पैसे ४ हजार ५०० रुपये १९ ॲाक्टोंबरच्या आत देण्याच्या तयारीत सरकार आहे.
काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना?
राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याकरता राज्य सरकारने ही योजना आणली आहे.
प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये सरकार जमा करणार आहे.
या योजनेचे पहिले दोन हफ्ते एकाच दिवशी रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच जवळपास १ कोटी महिलांच्या खात्यात जमा झाले होते
जून महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची घोषणा करण्यात आली.
१ जुलैपासून पात्र महिलांचे अर्ज स्विकारण्यास सुरु करण्यात आले.
१४ ॲागस्ट या दिवशी राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ॲागस्ट या दोन महिन्यांचे हफ्ते प्रत्येक दीड हजार यानुसार ३ हजार रुपये जमा झाले
जवळपास १ कोटी महिलांना या पहिल्या दोन हफ्त्यांचा लाभ मिळाला
तर, आता तिसऱ्या हफ्त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
यानुसार, १९ सप्टेंबर म्हणजे आज सायंकाळी ४ वाजल्यापासून पात्र महिलांच्या खात्यात तिसरा हफ्ता जमा होण्यास सुरुवात होईल
बहिणींना सणाचं गिफ्ट
समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व्यापक करण्याच्या तयारीत सरकार आहे. सणांच्या काळात बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार आहे. ॲाक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे १९ ॲाक्टोंबरपर्यंत बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार असून, हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.