बीडच्या बनावट नोटांचे धागेदोरे पुण्यात
बनावट नोटा चलनात आणण्याचे मनसुबे बीड पोलिसांनी उधळले, बनावट नोटा आणि गावठी पिस्तूल सह आरोपी अटक
बीड प्रतिनिधी
बीडच्या बनावट नोटातील संशयित आरोपींच्या माहितीवरून त्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आणण्यासाठी पुणे येथून वापर होणार असल्याची माहिती मिळाली. संबंधिताच्या माहितीवरून बीड पोलिसांनी पुणे येथे धाडसी कारवाई करत संबंधित आरोपीकडून बनावट नोटांसह गावठी पिस्तूल आणि संशयित आरोपीला ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे.या कारवाईबद्दल बीड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बीड शहर पोलीस स्टेशन येथे बनावट नोटां प्रकरणी दाखल गुन्ह्याचे तपासात गुन्ह्यातील फरार आरोपी यांचा शोध घेत असतांना गुन्ह्यातील फरार आरोपी मनिष क्षीरसागर हा त्याच्या साथीदारामार्फत पुणे येथे मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणणार असल्याबाबत माहीती पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन शहर पोलीस स्टेशन बीडचे एक पथक तपासकामी पुणे येथे रवाना करण्यात आले होते. बीड शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने पुणे येथे जावून दिनांक 19/09/2024 रोजी आरोपीचा शोध घेतला असता मनिष क्षीरसागर याचा साथीदार प्रविण गायकवाड रा. भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड हल्ली मुक्काम आंबेगांव पुणे यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने सांगीतले की, गुन्ह्यातील आरोपी मनिष श्रीरसागर याने प्रविण गायकवाड याचेकडे बनावट नोटांचे नमुने तसेच एक गावठी पिस्तुल पाठविले होते. प्रविण गायकवाड याचे आंबेगांव येथील निवासस्थानाची घरझडती घेतली असता त्याच्याकडे 8500/- रुपयाच्या बनावट नोटा तसेच एक गावठी पिस्तुल मिळून आल्याने त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. आतापर्यत सदर गुन्ह्यात 1 विधीसंघर्ष बालक व इतर 5 आरोपी निष्पन्न झाले असुन त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी आकाश जाधव व प्रविण गायकवाड यांना आज दिनांक 20/09/2024 रोजी न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दिनांक 24/09/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांबर गोल्डे, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. बाबा राठोड, पोलीस अंमलदार मनोज परजणे, अश्पाक सय्यद, जयसींग वायकर यांनी केली
आहे.