केज मतदार संघाचे पहिले आमदार होते स्वामी, राखीव मतदार संघाच्या शेवटच्या टर्मचे आमदार देखील होऊ शकतात स्वामी !
बीड / शेख आयेशा
केज विधानसभा मतदारसंघ हा आजही सर्वांगीण विकासाच्या टप्प्यापासून कोसो दूर आहे. याला जबाबदार असलेल्या तत्कालीन आणि विद्यमान सर्व लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मराठवाडा हैदराबादच्या निजामी राजवटीतून मुक्त झाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये येळंबघाट येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी रामलिंग स्वामी हे 1952 च्या केज मतदार संघातील पहिल्या निवडणुकीचे आमदार ठरले होते. तब्बल 72 वर्षानंतर केज या राखीव म्हणून शेवटच्या मतदारसंघाचे आमदार देखील स्वामीच होऊ शकतात. या राजकीय विश्लेषणाने अनेकांच्या भुवया उंचावतील पण वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.
मराठवाडा हा हैदराबाद स्टेटच्या म्हणजेच निजामाच्या राजवटीतून मुक्त झाल्यानंतर 1952 मध्ये पहिल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यावेळी केज मतदार संघातून मतदार संघासाठी उपरे आणि नवा चेहरा असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी रामलिंग स्वामी यांना उमेदवारी दिली. वास्तविक रामलिंग स्वामी हे बीड विधानसभा मतदारसंघाचे दावेदार होते. मात्र स्थानिक राजकारणामध्ये त्यांना बळीचा बकरा ठरवण्यासाठी तत्कालीन स्थानिक नेतृत्वाने काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींकडे आपले वजन वापरून स्वामीजींना बीड विधानसभा डावलून केज मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. यामागे ते आमदार व्हावेत हा हेतू नव्हता तरी देखील केज मतदार संघासाठी स्वामीजींचा चेहरा नवखा असतानाही त्यांचा चेहरा प्रामाणिक आणि निष्ठावंत असल्याने केजच्या स्वाभिमानी मतदारांनी तो स्वीकारला. त्यांना पहिल्याच निवडणुकीत केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार केले.ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामलिंग स्वामी यांनी देखील आपल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये केज मतदार संघाच्या विकासाचा पाया खऱ्या अर्थाने रचला. पुढे राजकीय वातावरण टप्प्याटप्प्याने बदलत गेले. केज मतदार संघावर आडसकरांचे त्यावेळी आणि आजही वर्चस्व होते आणि आहे. त्यामुळे जेव्हा केज मतदार संघ हा राखीव मतदारसंघ झाला त्यावेळी तत्कालीन लोकप्रतिनिधी हाबाडा फेम बाबुराव आडसकर यांनी जय भीम पेक्षा राम राम बरा असा थेट नारा देऊन निवडणुकीत समर्थक सातपुते यांना उभे केले आणि पुढे परळीचे गंगाधर स्वामी यांना देखील समर्थन दिले. केज मतदार संघ राखीव मतदार संघ असताना देखील आडसकर ठरवतील तोच केज विधानसभेचा आमदार होत होता.याला ब्रेक दिला तो तत्कालीन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी. त्यांनी केज मतदार संघामध्ये ओन्ली विमलचा नारा दिला. स्वर्गीय लोकनेत्या विमलताई मुंदडा यांनी देखील केज मतदार संघावर आपले अबाधित वर्चस्व कायम ठेवून नेतृत्व करत केज विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला. सत्तेत असताना आणि सत्तेत नसतानाही त्यांनी केजचे छोटे छोटे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अंबाजोगाई तालुका हा जिल्हा व्हावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अंबाजोगाईकर कधीही विसरणार नाहीत. त्यांनी अंबाजोगाई हा तालुका असताना सुद्धा जिल्हास्तरावर असणारे सर्व शासकीय कार्यालय हे अंबाजोगाईत उभारले. त्यामुळे अंबाजोगाई हे नाव जिल्हा होण्याच्या यादीमध्ये अग्रक्रमाने पुढे आले. भविष्यात अंबाजोगाई जर जिल्हा झाला तर त्याचे खरे श्रेय विमल ताईंचेच असू शकेल.विमलताई यांच्या अकाली निधनानंतर पुढे आता त्यांचा वारसा त्यांच्या सुनबाई नमिता अक्षय मुंदडा या चालवत आहे मात्र त्यांना विमलताई प्रमाणे आमदार म्हणून लोकमान्यता आणि केज मतदार संघाच्या विकासाचे पाईक होता आले. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही केज मतदार संघामध्ये पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेर विरोधक म्हणून उभे राहणारी संख्या मुंदांडाजींच्या विरोधात आज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे केज मतदार संघामध्ये पुन्हा मुंदडा असा नारा चालणे तितकेसे सोपे राहणार नाही. आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतात ? यावर केज मतदार संघासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये क्रांतिकारी बदलाव झालेले दिसले तर राजकीय आश्चर्य वाटायला नको. मराठा आरक्षण मुद्द्यावरून ज्या मतदार संघावर सर्वाधिक अधिराज्य केले. त्या काकाजीना देखील अनेक गावांमध्ये गाव बंदी करण्यात आली. त्यांना लोकसभा निवडणुकीत आणि त्यापूर्वी त्यानंतर सुद्धा गावात येण्यास मज्जाव केला.ही बाब येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच हितावह ठरणार नाही.आज नमिता मुंदडा यांच्या विरोधामध्ये पक्षांतर्गत आणि विरोधाततील विरोधक देखील मोठ्या प्रमाणात उघडपणे विरोधात उतरले आहेत. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक विद्यमान आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्यासाठी सहज सोपी राहणार नाही. केज मतदार संघ यावेळी राखीव मतदार संघ म्हणून शेवटच्या निवडणुकीला सामोरा जात आहे. या पंचवार्षिक निवडणुकीनंतर केज मतदार संघ हा राखीव राहणार नाही. तो खुला मतदार संघ होईल. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार आपल्या पक्षाचा आपल्या विचाराचा आपल्या गटाचा निवडून आला तर पुढे केज मतदार संघातून आपणच आमदार म्हणून निवडून येऊ आणि आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण करू. या आशा आणि अपेक्षांनी अनेक दिग्गज नेत्यांनी आता केज मतदार संघासाठी कंबर कसली आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पत्रकार वैभव विवेक स्वामी यांनी वंचित बहुजन आघाडी कडून पहिली निवडणूक लढवली. वैभव स्वामी यांना कोणत्याही राजकीय निवडणुकीचा अनुभव नसताना आपल्या आमदार असलेल्या आजोबांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी विधानसभा निवडणुकीत कोणतीही दुकानदारी न करता प्रामाणिकपणे लढा देऊन वंचित बहुजन आघाडीच्या मतांच्या मतपेटीमध्ये तब्बल दहा हजार मतांचा पल्ला गाठला. केज वगळता मराठवाडा आणि इतर विधानसभा मतदारसंघात त्यावेळी चार ते पाच हजाराचा पल्ला फक्त उमेदवारांना गाठता आला. काही अपवादात्मक उमेदवार मात्र चांगले समाधानकारक मतदान घेऊ शकले होते. अशा फिरलेल्या राजकीय वातावरणात वैभव स्वामींनी कोणत्याही राजकीय शक्तीपुढे नतमस्तक न होता प्रामाणिकपणे लढा देऊन वंचितच्या झोळीमध्ये दहा हजार मतांचा जोगवा टाकला. केज मतदार संघात आंबेडकरांवर प्रचंड प्रेम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर आहे. हे मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या मतपेटीतून सिद्ध केले होते.
आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थिती कशी असेल ? कोणते पक्ष कोणासोबत जातील ? याची कोणतीही शाश्वती आज नसताना जर केज विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटाने जर केज मतदार संघाचे पहिले आमदार रामलिंग स्वामी यांच्या कार्याची दखल घेत आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून थेट विधानसभा निवडणुकीत चर्चेला आलेले पत्रकार वैभव स्वामी यांना जर शरदचंद्र पवार साहेबांनी संधी दिली आणि मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या भूमिकेला मान्यता देऊन पाठबळ दिले तर आज जरी चर्चेत नसले तरी देखील राखीव म्हणून शेवटची निवडणूक ज्या केज मतदार संघाची लढवली जाणार आहे त्या मतदारसंघात जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने संधी दिली, जरांगे पाटलांनी पाठबळ दिले तर केज मतदार संघाचे पहिले नेतृत्व आमदार म्हणून स्वामी यांनी केले आणि राखीव मतदार संघाचे शेवटचे आमदार म्हणून देखील त्यांचेच नातू धडाडीचे पत्रकार वैभव स्वामी होवू शकतात असे म्हटले तर वावगे ठरू नये.