फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्याल – नेत्रतज्ञ डॉक्टर एकनाथ पवार
बीड राजयोग प्रतिनिधी
दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे, चुकीच्या पद्धतीने फटाके वाजवल्यामुळे डोळ्यांना मोठ्या प्रमाणात इजा होणाऱ्या घटना घडतात.फटाके फोडण्याचा आनंद घेत आपले डोळे देखील सुरक्षित कसे ठेवावेत या संदर्भात आपण काळजी घेणे गरजेचे आहे. तरच आपली दिवाळी आनंदात जाईल असे मत सिद्धिविनायक नेत्रालय हॉस्पिटलचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर एकनाथ पवार यांनी व्यक्त केले आहे.
फटाक्यापासून आपले डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी अर्धवट विझलेले फटाके हातात अथवा डोळ्याजवळ घेऊन जाऊ नये. फटाके वाजवताना सेफ्टी चष्मे वापरावेत. मोठ्या व्यक्तीने फटाके फोडताना लहान मुलासोबत असणे व त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. फटाक्यामुळे डोळ्यांना ज्या इजा होऊ शकतात आणि त्यापासून निर्माण होणारे धोके आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पापण्यांना मार लागून पापणी जळणे अथवा फाटणे, डोळा जळणे अथवा डोळ्यात माती खडे जाऊन इजा होणे, भुबळ फाटणे, डोळ्यात रक्त उतरणे, रेटिनाला जखम होणे, रेटिना सरकणे, डोळ्यांच्या खोबणीचे हाड फ्रॅक्चर होणे, डोक्याची नस ऑप्टिक नर्व मार लागून कायमस्वरूपी निकामी होणे या सर्व कारणामुळे अंशतः किंवा पूर्णतः अंधत्व येऊ शकते. त्यामुळे फटाके वाजवताना प्रत्येकाने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.आपण फटाक्यापासून सुरक्षित अंतर ठेवले आणि वरील प्रमाणे काळजी घेतली तर फटाके वाजवण्याचा आनंद आणि डोळे देखील सुरक्षित राहण्याचा आनंद आपली दिवाळी द्विगणित करेल हे नक्की. असे मत सिद्धिविनायक हॉस्पिटलचे मुख्य संचालक प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर एकनाथ पवार यांनी व्यक्त केले आहे.